Saturday, December 16, 2017

सवाई २०१७ । दिवस तीन


आजच्या दिवसाची सुरुवात आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शिष्या गायत्री जोशी ह्यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंती गायला. अत्यंत आखीव रेखीव अशा पद्धतीने त्यांनी मधुवंतीची मांडणी केली. मैफलीच्या मध्यावर त्यांनी सरगम व आलापांच्या मदतीने राग उलगडून दाखवला. अत्यंत निरामय व सुंदर गायनामुळे आजच्या दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न झाली. मधुवंती नंतर गायत्री यांनी 'म्हारे घर आओ जी' हे भजन आणि 'जननी ये जिवलगे' हा अभंग गाऊन आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य जोशी ह्यांनी केली.

दुसऱ्या सत्रात कुशल दास यांचं सतारवादन होतं. त्यांनी राग मारवाची मांडणी केली. अत्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या मैफलीत कुशल दास यांना तबल्यावर पं. रामदास पळसुले यांची समर्थ साथ लाभली. एकमेकांच्या साथीने हे सादरीकरण अजूनच खुलत गेलं. स्वरमंडपात बसलेल्या सर्वच श्रोत्यांना या सादरीकरणादरम्यान जणू दैवी अनुभूती आली. मैफलीच्या मध्ये येणाऱ्या व्यत्ययांवर मात करत कुशल दास यांनी सांगीतिक कौशल्याची परिसीमा गाठली. यानंतर त्यांना वन्स मोअर न मिळता तरच नवल! वन्स मोअर चा अत्यंत आदराने स्वीकार करून त्यांनी आपल्या कलेची अजून एक चुणूक दाखवली. वेळ पाळण्याबद्दल अगदी आग्रही असलेल्या निवेदक आनंद देशमुखांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा आधार घेत श्रोत्यांना पुन्हा वन्स मोअर न देण्याबद्दल विनवले.

कुशल दासांच्या त्या दैवी सतारवादनाचा असर सरतो न सरतो तेवढ्यात पतियाळा घराण्याचे गायक सम्राट पंडित यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी राग गोरख कल्याण गाऊन आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. सुरेल गळ्याच्या सम्राट पंडित यांच्या गाण्यात त्यांची सदैव असलेली हसरी मुद्रा अजूनच रंग भरत होती. पंडित यांनी तबल्याची साथ पं. रामदास पळसुले व सारंगीची साथ दिलशाद खां यांनी केली. त्यावेळी तानपुऱ्यावर डॉ. राजश्री महाजनी व प्रलय मंडल साथीला होते.

आजच्या दिवसातील शेवटचं सत्र आणि तिसऱ्या दिवसाचा परमोच्च आकर्षणबिंदू म्हणजे पं. उल्हास कशाळकर यांचे गायन. कशाळकरांना हार्मोनियमच्या साथीला तुळशीदास बोरकर यांचे शिष्य श्रीराम हसबनिस, तसेच तानपुऱ्याच्या साथीला समर्थ नगरकर व सौरभ नाईक होते. गायनाला सुरुवात होण्यापूर्वी कशाळकरांचे मध्यप्रदेश सरकार कडून 'तानसेन पुरस्कार' मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तबल्याच्या साथीला असलेल्या तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांनी पूर्वी कशाळकरांबद्दल लिहिलेला एक परिच्छेद वाचून दाखवण्यात आला. आपल्या होणाऱ्या कौतुकाचा नम्रपणे स्वीकार करून व गुरुजनांप्रती आदर व्यक्त करून कशाळकर यांनी राग नंदने गायनास सुरुवात केली. अत्यंत शिस्तबद्ध, संयत व घरंदाज गायकीचे प्रदर्शन घडवत त्यांनी नंद रागाचे सौंदर्य उलगडून दाखवले. त्यांनंतर त्यांनी राग अडाणाचे सादरीकरण केले. शेवटच्या काही मिनिटांमध्ये भैरवी गात त्यांनी दिवसाचा समारोप केला.



भैरवी हा शेवट असतो. गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आतून रितं करणारा शेवट. मनातल्या वादळांना शांत करणारा शेवट. आपल्याला अंतर्मुख करणारा शेवट. सगळं संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहिलेली ती भैरवी आणि हळूहळू रिकामा होत जाणारा तो स्वरमंडप, या दोहोंना घेऊन मी उभा होतो. कसल्यातरी अंतिमाच्या न संपणाऱ्या शोधात...

Image may contain: 1 person, on stage and playing a musical instrument
पं. उल्हास कशाळकर - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

Image may contain: 1 person, sitting and night
कुशल दास - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

- रजत जोशी 
(सवाईच्या एका फॅन-पेज साठी लिहिलेलं वृत्त.)



No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *