Tuesday, December 19, 2017

HBD ब्लॉगोबा


गेले सलग ६ दिवस ब्लॉगवर पोस्ट टाकत होतो, आणि आजचा हा सातवा दिवस! इतक्या कन्सिस्टन्सीने ब्लॉग लिहीन असं जन्मात कधी वाटलं नव्हतं. (याआधीच्या असंख्य विशेषणांनी भरलेल्या ५ पोस्ट्सपेक्षा हे लिहिताना नक्कीच मोकळं मोकळं वाटतंय...) असो!

आज माझ्या ब्लॉगला २ वर्षं पूर्ण झाली. म्हणजे या ब्लॉगवरची पहिली पोस्ट मी १९ डिसेंबर २०१५ ला टाकली होती, तिला २ वर्षं झाली. २ वर्षांत एकूण २२ पोस्ट मी लिहिल्या. (ही २३वी!) ब्लॉग लिहायला सुरु करण्यापूर्वी इतपत जमेलसं खरंच वाटलं नव्हतं. जमलं तर जमलं, नाही तर नाही... अशा अटीट्युडने ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण एक गोष्ट नक्की ठरवली होती, ती म्हणजे एखादा लेख मनापासून आवडला तरच ब्लॉगवर टाकायचा. थोडंफार जमलेलं काहीतरी, किंवा बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही असल्या कारणांनी कधीच दर्जाहीन गोष्टी पोस्ट करायच्या नाहीत. लोकांना आवडो न आवडो, पोस्ट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे.

२ वर्षात ब्लॉगला साधारण ८२०० पेक्षा जास्त व्हूज मिळाले. त्यापैकी साधारण ६००० पेक्षा जास्त हे भारतातून आणि ९०० पेक्षा जास्त हे अमेरिकेतून मिळालेले आहेत. मला नकाशावर बोटही दाखवता येणार नाही अशा अनेक देशांमधल्या अनेक वाचकांनी हा ब्लॉग वाचला. अनेकदा अनोळखी लोकांच्या कमेंट्स किंवा इमेल आले. एखादवेळेस एखाद्याला एखादा ब्लॉग खूपच भावला तर त्याचं भरभरून कौतुक असेल, किंवा एखादा दुसरा ब्लॉग वाचण्यासाठी सुचवणं असेल... असा प्रतिसाद नेहमीच भारी वाटायचा. त्यात कौतुक झाले यापेक्षा, कुणीतरी निदान वाचतंय तरी असा 'हुश्श!' भाव अधिक असायचा.

मी ब्लॉग लिहायला सुरु केलं तेंव्हा मराठी ब्लॉग्सच्या डिरेक्टरीज असायच्या. त्यावर एकदा रजिस्टर केलं कि नवीन ब्लॉग टाकल्यावर तिकडे दिसायचा. मग तिकडे येणाऱ्या लोकांना टायटल बरं वाटलं तर ते आपला ब्लॉग वाचणार. मी जिथे रजिस्टर केलं ती ब्लॉग डिरेक्टरी आता बहुदा बंद पडलीये आणि बाकी डिरेक्टर्यांना मला रजिस्टर करून घेण्याची इच्छा दिसत नाहीए. त्यामुळे आता जे काही व्ह्यूज येतात ते मीच गावभर केलेल्या जाहिरातीमुळे.

अनेकांना माझा ब्लॉग आवडतो. अनेक जण वाट बघतात. भेटल्यावर आवर्जून आठवण काढतात. लिहायला प्रोत्साहित करतात. असं कुणाकडून काही ऐकलं कि बरं वाटतं. अनेकांना ब्लॉग आवडतही नाही. अशा लोकांचाही मला उपयोग होतो. त्यातले काही लोक खरंच चांगल्या सुधारणा सुचवतात. मी त्यांचा विचार करतो, त्या पटल्या तर अमलात आणतो. याचा मला माझा ब्लॉग सुधारण्यास फायदा होतो. पण काही लोक काही कारण नसताना (किंवा आवडला असूनही तसं म्हणायची लाज वाटत असल्याने, किंवा पचत नसल्याने) ब्लॉगला नावं ठेवतात. यावरून मला मी करतो ती गोष्ट नक्की कुणासाठी आहे हे जास्तीत जास्त क्लिअर होत जातं. चालायचंच!

२ वर्षं म्हणजे काही फार मोठा टप्पा नाही याची मला जाणीव आहे. पण आपण केलेल्या गोष्टींकडे मागे वळून बघायला कुठे काय ठराविक कालावधी असतो? तुमच्यासारख्या माझ्या लाडक्या वाचकांमुळेच मी इतकं लिहू शकलो. यापुढेही मला मोटिवेट करत रहा, चुकांची जाणीव करून देत राहा, सुधारणा सुचवत राहा, आवडलं तर तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचवत जा. एवढं पुरेसं आहे मला. (आणि हो! अनेकांनी अनेकदा विचारलेला प्रश्न- मला ब्लॉगचे पैसे किती मिळतात? उत्तर आहे, शून्य! मराठी ब्लॉगवर जाहिराती वगैरे देत नसतं कुणी. भविष्यात मिळायला लागले तर नक्की सांगेन. (किंवा तुम्हाला माहित असेल कसे मिळवायचे तरी सांगा!))

खाली काही स्क्रीनशॉट लावले आहेत. जाता जाता वाचून जा!















अजून होते थोडे... पण हरवले!

6 comments:

  1. मस्तच! अभिनंदन! आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा :)

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद, आदित्य!

      Delete
  2. Chhan!! Kharach manapasun je lihawese watate tech lihile ki te chhan jamatech... All the best... Lihita raha..

    ReplyDelete
  3. व्वा..... रजत चांगलं लिहीतोयस. तुला पुढच्या लिखाणासाठी खूप शुभेच्छा....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच ब्लॉगला नियमित भेट देत राहा व आपले अभिप्राय कळवत राहा.

      Delete

Contact Form

Name

Email *

Message *