Thursday, September 07, 2017

काय टायटल देणार ह्याला !

कुठल्याशा फुट्कळशा लेखाने शहाणं व्हायला झालं असतं तर बरं झालं असतं, नाही? आपण (म्हणजे मी) काहीबाही लिहितो. काssही दर्जा नसतो त्याला. स्वैर, अर्थहीन सगळं. उगाच आपलं उचललं पेन, लावलं कागदाला. पण मला माझं समाधान मात्र मिळत असतं त्यातून. मी काय लिहितो हे कुणाला आवडतं का किंवा कुणी खरंच impress होतं का, याची मुळीच जाणीव नाही मला. पण त्यातून अक्कल काही मिळत नाही हे मात्र खरं. म्हणजे मलातरी. बाकीच्यांचं माहित नाही. इतका विचार वगैरे करूनही मला अजून माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. नियंत्रण सोडाच हो, साधा अंदाज लावायला जमत नाही अजून. उगाच कधीही हसू येतं, उगाच कधीही रडू कोसळतं. कधीकधी उठून अख्खं जग जिंकायची उर्मी येते, तर कधी श्वास घेण्याचीही इच्छा संपते. मला माहित नाही का होतं असं; आणि ह्या माहित नसण्याचाच तर सगळ्यात जास्त त्रास होतो... 

Friday, July 21, 2017

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ!
झावळीच्या कडेवरून ओघळणारे पावसाचे थेंब,
पन्हाळ्याचा टिप-टिप आवाज
आणि
एक असह्य होत चाललेली कविता...

ती संध्याकाळ!
मेघांनी आक्रसून टाकलेलं आभाळ,
विजांचा अभावित कडकडाट
आणि
संधीप्रकाशाचा निर्जीव प्रभाव...

ती संध्याकाळ!
झाडांच्या आडून डोकावणारं ते सरत्या दिवसाचं अस्तित्व,
निर्हेतुक वारा
आणि
त्या वाऱ्याचा गवताळ, मातकट, अनाथ वास...

ती संध्याकाळ!
चेहऱ्यावर उडणारे पावसाचे थेंब,
दूरवर सूर्यास्ताच्या कृपेने उधळलेले शेकडो रंग
आणि
त्या रंगांत रंगत चाललेली, ती संध्याकाळ!


Saturday, June 03, 2017

तळं

तळ्याच्या काठी,
दगड टाकत आणि काठ्या बुडवत
करायचा असतो विचार.
मांडायचा असतो लेखाजोखा आणि
जुळवायचा असतो हिशोब
झाल्या-गेल्याचा,
जमल्या-फसल्याचा आणि
विसरू पाहणाऱ्या आठवणींचा.

एखादं गाणं,
आपलंच आपल्याशी
गुणगुणत राहायचं असतं.
एखादी कविता,
फक्त आपल्यालाच आवडलेली 
ऐकवत राहायची असते.
आपलीच, आपल्याच मनाला.
रंगवायची असते एखादी मैफल 
निवडक गाण्यांची वा
मोजक्याच कवितांची.
आठवणीतल्या थोरांना स्मरत,
आपणही व्हायचं असतं
मोठं वगैरे,
जिंकायला ती मैफल,
जी आपणच रंगवली होती,
आपल्याच साठी.

तळं, दगडं वगैरे निमित्त फक्त.
मूळ मुद्दा संवादाचा.
हरवलेल्या गप्पा परत सांधण्याचा.
विसरलेल्या सुरांत,
हरवलेल्या भावना मिसळायच्या असतात,
अर्धवट चित्रात रंग सुने भरायचे असतात.
भरता भरता रंग,
थोडे लावूनही घ्यायचे असतात,
कोण काय म्हणेल पाहून,
विचार सगळे विसरायचे असतात.

तळं एव्हाना भरलेलं असतं.
हातातले दगड संपलेले असतात.
दगडांची चूक नसतेच मुळी,
तळ्याची भूक भागलेली असते.
Monday, March 13, 2017

प्रिय!


प्रिय मुलास,

वरच्या वाक्यात 'प्रिय' लिहीताना हात अडखळला. 'प्रिय' कोणास लिहावे याचे काही ठोकताळे माझ्या मनात आहेत. ज्या व्यक्तीला आपण अप्रिय तर झालो नाही ना, अशी शंका येते त्यालाच प्रिय लिहून आश्वस्त करावं असं माझं मत आहे. पण मुलाला प्रिय लिहीण्याचं काही कारण सापडेना. पण मग दुसरं काय लिहावं तेही सुचेना. मग शेवटी लिहीलंच आणि केली सुरुवात.

नमनालाच घडाभर तेल घालवून ही आज आपल्याला काय सांगणार आहे याची उत्सुकता तुला वाटत असेल. पत्राच्या या टप्प्यावर असलेले तुझे आश्चर्यमिश्रित कुतुहलमिश्रित उत्सुक भाव मला पत्र लिहीतानाच जाणवतायत. का नाही जाणवणार? आईला सग्ग्गळं कळत असतं. मुलाच्या भावनांपासून त्याच्या वेदनांपर्यंत. सगळं!

तुला आठवतंय? लहानपणी शाळेत असताना तू एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होतास. 'माझी आई' असा त्या निबंधाचा विषय होता. तू त्यात किमान २० वेळा 'माझी आई जगातली सर्वात चांगली आई आहे' अशा आशयाचं वाक्य लिहिलं होतंस. जेमतेम ३०-३५ ओळींच्या निबंधात २० वाक्यं हिच लिहील्यावर अर्थातच तुझा निबंध स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला होता. तुझा तो हरलेला चेहरा मला अजुनही आठवतो. माझी आई टिचरच्या पण आईपेक्षा चांगली आहे हे टिचरला आवडलं नसेल अशी तुझी तक्रार होती. मी तुझा निबंध वाचला. माझ्या डोळ्यातून खळ्ळकन पाणीच आलं. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तू म्हणालास, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुढच्या वेळेला अजून चांगला निबंध लिहीन. पण खरं सांगू, हरल्याचं दु:ख नव्हतंच मला. माझ्यासाठी तुझाच निबंध सर्वोत्तम होता. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' किंवा 'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि' असली वाक्य छापून पहिलं बक्षिस मिळवणाऱ्याचा हेवा नव्हताच मला. मला कौतुक होतं ते तुझ्या निरागसतेचं. मनातली निरागसताच मनातलं प्रेम जपत असते याची जाणीव मला त्या दिवशी झाली होती.

तुला माहीतीये? मी क्रिकेटची मॅच का बघते? त्या कोहलीने मारलेल्या फोरचं किंवा धोनीने मारलेल्या सिक्सचं मला काहीच नसतं. पण त्याने फोर मारल्यावर तुझ्या तोंडावरचा ओसंडून वाहणारा आनंद मला महत्वाचा असतो. खरंतर माझं मॅचकडे लक्ष नसतंच मुळी. माझं लक्ष असतं तुझ्याकडे. तुझ्या आनंदाकडे. ज्या आनंदाची मी चाहती आहे, ज्या आनंदाची मी भुकेली आहे, त्या आनंदाकडे.

हे पत्र लिहीणं म्हणजे खरंतर आठवणींचा प्रवासच आहे. तुझ्या जन्मापासून ते अगदी कालपर्यंतच्या आठवणींचा झरा माझ्या मनात वाहतो आहे. तू जेंव्हा पहिल्यांदा 'आई' बोललास, जेंव्हा पहिल्यांदा चालायला लागलास, जेंव्हा पहिल्यांदा शाळेत गेलास, तुझे पहिले मित्र, तुझ्या सगळ्या आठवणी, अगदी सगळं सगळं कसं लख्ख आठवतंय. आठवतायत ते क्षण तुझ्या आनंदाचे, तुझ्या उत्साहाचे अन् आश्चर्याचे, नि तेही, तुझ्या पराभवाचे, अपमानाचे आणि रडवेल्या चेहऱ्यांचे. तू पहिल्यांदा सायकल चालवलीस त्या क्षणापासून ते काल रात्री विमानात बसून दूर देशी निघून जाण्याच्या क्षणापर्यंत. सगळं आठवतंय. अगदी स्पष्ट!

नाही. कालवाकालव नाही, उदासीनता नाही, हृदयात आहे, फक्त पोकळी. आजवर केवळ तुझ्या अस्तित्वाने व्यापलेल्या माझ्या आयुष्यात तुझ्याच जाण्याने बनलेली पोकळी. या पोकळीची, या एकटेपणाचीही सवय होईल काही दिवसांनी. पण ती पोकळी विरणार मात्र नाही. ती तशीच असेल. माझ्या मनात. कायमच.

हे पत्र लिहीण्यामागे emotional blackmail करण्याचा हेतू नाही. 'कायमचा जातो आहे. परत कधीच येणार नाही' या तुझ्या निर्धाराला सुरुंग लावण्याचाही हेतू नाही. विमानतळावर तू हट्टाने रोखलेल्या अश्रुंना पाझर फोडणे हाही हेतू नाही. मनातल्या तळमळीचं रुपांतर हळहळीत होण्यापूर्वीच तीला कागदावर उतरवण्यासाठी हे पत्र.

मला तुला परत बोलवायचं नाही, मला तुझ्या प्रगतीच्या आड यायचं नाही, मला माझ्या भावना तुझ्यावर लादायच्या नाहीत, किंबहुना मला तुला कोणताच त्रास होऊ द्यायचा नाही. फक्त आपल्या निर्णयामुळे आपल्या माणसांची आयुष्यं बदलू शकतात, याची जाणीव तुला करुन द्यायची आहे.

मला माहीत नाही की मी हे पत्र खरंच तुला पाठवेन की नाही. पण जर पाठवलंच तर या डबडबलेल्या डोळ्यांची साक्ष देऊन सांगते की माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, जेवढं काल होतं, आणि उद्याही राहील.

तुझ्याच आठवणींत रममाण,

तुझीच आईImage source - Google


पूर्वप्रसिद्धी: Sourabh, annual magazine of MIT


Contact Form

Name

Email *

Message *