Saturday, June 25, 2016

ब्रेक्झिट-पुराण


ब्रेक्झिट झालं! कोण तो ब्रिटन देश कुठल्याश्या यूरोपियन युनियन मधून बाहेर पडला. आमचा काय संबंध? काsssही नाही! पण आम्हाला चघळायला विषय तर मिळाला ना...

"कित्ती बावळट आहेत हे ब्रिटनचे लोकं", "स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.", "राहिले असते सुखाने तर काय बिघडलं असतं?" इथपासून ते "ब्रेक्झिट म्हणजे काय असतं रे?" किंवा "आपला काय संबंध त्याच्याशी?" पर्यंत प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. हल्ली ह्या असल्या प्रतिक्रिया देणं किंवा एखाद्या विषयावर घनघोर चर्चा करणं किंवा आपलं असलं-नसलं सगळं ज्ञान पाझळणं हे फार सोप्पं होऊन गेलं आहे. एखाद्या विषयावर सर्च करायचं, एखादी बऱ्यापैकी दिसणारी (म्हणजे interface वगैरे बरंका) website पकडायची आणि द्यायची लिंक पाठवून गावभर! ह्यातून होतं काय? तर आपल्याबद्दल असा सुगैरसमज (हा माझाच शब्द बरंका! चांगला पण चुकीचा समज याअर्थी. कसा वाटतोय?) पसरतो की ह्याला कळतंय बुवा खूप काही! खरंतर आपण किंवा सुगैरसमज करून घेणाऱ्यानी ती website वरची गोष्ट पूर्ण वाचलेलीच नसते (किंवा वाचली तरी कळते किती जणांना काय माहीत!). पण असं कसं सांगायचं? आपल्याबद्दल कुगैरसमज पसरणार नाहीत का? असं कसं होऊन चालेल? नाही नाही! त्यापेक्षा काहीतरी मोघम बोलायचं. चर्चा वाढवत ठेवायची.

तर मुद्दा होता 'ब्रेक्झिट'चा! तिकडे ते ब्रिटनवाले बाहेर पडले, त्यांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि इकडे आमची चर्चा सुरू झाली. ह्या असल्या चर्चा त्या NEWS चॅनेलवाल्यांपेक्षा जास्त रंगतात, वाढतात, फोफावतात आणि भरकटतात असा अनुभव आहे. त्या चॅनलवाल्यांकडे 'ब्रेक के बाद'चं अस्त्र तरी असतं. एक तासाची वेळ तरी असते. इथे कसलं काय? सगळेच तापलेले! तावातावाने बोलायचं, कशाची तरी बाजू घ्यायची आणि मुद्दे मांडायचे! तर अशी ही चर्चा सुरू झाली. कुणीतरी म्हणलं की मूर्खपणा केला या ब्रिटनवाल्यांनी, कुणीतरी म्हणलं बरोबरच आहे त्यांचं. कुणी पहिल्याची री ओढतंय, कुणी दुसऱ्याला पाठिंबा देतंय. कुणी लिंक्स पाठवतंय तर कुणी व्हिडिओ. हे असलं सगळं तप्त वातावरण चालू असतानाच एक कोणीतरी आला आणि म्हणू लागला की काय त्या 'ब्रेक्झिट' वर चर्चा करता, भारतातल्या खेडोपाडी काय कमी प्रश्न आहेत का? झालं! सगळे त्याच्यावर तुटून पडले. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं म्हणजे भारतातल्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील असणं असं नाही, वगैरे त्याला सांगू लागले. इतका वेळ ब्रिटन चा कौल बरोबर की चूक यावर तावातावाने भांडणारे आता एक होऊन 'ब्रेक्झिट'वर चर्चा करावी का नाही यावर भांडू लागले. यातच कुणीतरी चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे वगैरे ज्ञानामृत पाजायला सुरू केलं आणि भांडाभांडीचा नुसता कल्लोळ उडाला.

कालांतराने मूळ मुद्दा बाजूलाच राहून, 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कितपत योग्य आहे यावरच जास्त चर्चा होऊ लागली. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कसं जास्त 'ग्लॅमरस' वगैरे आहे, आणि भारतातल्या प्रश्नांवर चर्चा करणं हे कसं लोकांना 'अनइंटरेस्टिंग' वाटतं असले मुद्दे येऊ लागले. अश्या वेळेला माझी अवस्था मोठी विचित्र होते. कधी ह्याचं तर कधी त्याचं असं मला दोन्ही बाजूचं पटू लागतं. मग मत मांडणं सोडाच, पण मत बनवणं पण कठीण होऊन बसतं. तर ही चर्चा सगळे दमल्यावर थांबली. कुण्या शहाण्यांनी कुंपणावर बसून सल्ले देत सारवासारव केली आणि सगळं एकदम कसं छान-छान वाटू लागलं.

चर्चा थांबली, तरी मनातलं द्वंद्व थांबेना. 'ब्रेक्झिट'मागचं Economics आणि Politics समजून घ्यायची इच्छा माझीही होती, पण त्यापेक्षा आपण भारतातले प्रश्न समजून घेण्यासाठी इतका आटापिटा कधी केला होता का, असा प्रश्न मनात येऊ लागला. या चर्चेत काही लोकांनी अप्रत्यक्षपणे 'भारताचेच प्रश्न का महत्वाचे? आपण सगळ्याचा विचार केला पाहिजे' असा काहीसा उदारमतवादी सूर लावला होता. ते मात्र मला नक्कीच पटलं नव्हतं. अर्थात 'ब्रेक्झिट ला काय मोठं सोनं लागलंय, त्यापेक्षा भारतात बघा किती विषमता आहे' ह्या विधानाला सुद्धा मी नाक मुरडलं होतं. कुठलातरी मध्यममार्ग मला खुणावत होता, पण सापडत मात्र आजिबात नव्हता. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी माझा विचार करायला सुरुवात केली. भारतातले प्रश्न महत्वाचे नक्कीच आहेत पण म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करूच नये असं काही नाही, असं साधारण मत बनलं. पण यावर दोन प्रश्न माझ्या मनात आले की, 'भारत इतका महत्वाचा का?' आणि 'आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास का करायचा?' यापैकी दुसरा प्रश्न सोपा होता. त्याच्या उत्तराची मला सवय होती. मला खुणावत होता तो पहिला प्रश्न! 'भारत इतका महत्वाचा का?'

मध्यंतरी कुठल्याशा websiteवर एक प्रश्न वाचला होता. 'जर आपण कोठे जन्म घेतो हे आपल्या हातात नसेल, तर आपण आपल्या देशाचा अभिमान का बाळगावा?' तेंव्हासुद्धा मनात विचार सूरु झाला होता. भौगोलिक प्रदेशावर असणाऱ्या प्रेमाला (किंवा आदराला) हा सवाल होता. 'भारत माझा देश आहे' या वाक्याच्या अर्थाचा मनोमन विचार करायला लावणारा हा प्रश्न होता. देश माझा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे असं वाटत नाही का? हे असले प्रश्न त्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने मनात पिंगा घालू लागले.

भारतीय असल्याचा नक्की अभिमान तरी का? तर हा अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा, आमच्या इतिहासाचा आणि आमच्या परंपरांचा. अभिमान वाटतो तो इथल्या विचारधारेचा, इथल्या माणसांचा आणि या माणसांमध्ये असलेल्या माणुसकीचा. भले यात माझं काहीही कर्तृत्व नसेल, पण तरीही मला याचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. आपण इथे शहरांत बसून हे असले विचार करत असतो. कुठल्यातरी abstract गोष्टींवर विचार/चर्चा करत बसतो. देशाचा अभिमान बाळगावा की नाही याचा किस पाडत बसतो, पण त्या देशासाठी, किंवा कुणासाठीच करत मात्र काहीच नाही. हे सगळं असं असेल तर उपयोग काय अभिमान वाटून किंवा न वाटून? एखाद्या दुष्काळपीडित किंवा अंधश्रद्धाग्रस्त गावात काम करणारा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, किंवा सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी लढणारा जवान असेल, त्यांच्या मनात असले विचार का येत नाहीत? 'ब्रेक्झिट'वर चर्चा करता करता भारतातल्या प्रश्नांकडे पण लक्ष द्यावं असं त्यांना का वाटत नसेल? कारण ते ह्या देशाविषयी त्यांच्या मनात असलेला अभिमान जगत असतात. देशातल्या लोकांविषयी मनात असलेली आस्था कामात उतरवत असतात. त्यांना ह्या असल्या conflicts साठी वेळच नसतो मुळी! त्यांना 'देशाचा अभिमान का बाळगावा?' या प्रश्नापेक्षा 'देशासाठी काय काम करावं?' हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटत असतो.

हे सगळं माझ्या मनात आलं, आणि त्या 'ब्रेक्झिट'चर्चेमधला 'कृतीवर भर द्या' सांगणारा 'तो' आठवला. त्याच्या विचारांमधला खोल भाव हळू हळू लक्षात यायला लागला. अजूनही मला एकाच वेळी दोन्ही बाजू पटत असतात, पण दोन्ही बाजूंपेक्षा त्यातला सुवर्णमध्य मला जास्त जवळचा वाटतो. जेंव्हा चर्चा, मग ती कोणत्याही चकाकत्या किंवा साध्याशाच विषयावरची असो, संपून कृतीची सुरुवात होईल, तेंव्हाच तो सुवर्णमध्य खऱ्या अर्थाने साधला जाईल.

Tuesday, June 07, 2016

बसल्या बसल्या


कधी कधी वाटतं की नुसतं बसावं...

डोळे उघडूही नयेत अन् मिटूही नयेत.
श्वास सोडूही नये अन् घेऊही नये.
फक्त बसावं.

काहीच करु नये. कुठेच जाऊ नये.

खिडकीतून वारा येईल,
झाडांची पानं हलतील,
ते फक्त बघावं.
पचवावं.
परत बघावं.
परत पचवावं.
हा वारा कधी थांबूच नये असा विचार करावा.
थांबल्यावर,
परत वाहू नये असा धावा करावा.
तो वारा, ती पानं, ते आपण, असंच असावं.
विचार करत करत फक्त बसावं.

कुठलासा गंध येईल,
कसलासा आवाज येईल.
कुणीतरी कुठेतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी कुणालातरी काहीतरी सांगेल.
आवाजांमागून आवाज, ऐकत रहावं.
ऐकत ऐकत फक्त बसावं.

एखादी कविता आठवेल,
एखादं यमक जुळेल,
एखादी चाल सुचेल.
ती चाल मनात घोळवत ठेवावी.
मनातल्या मनात गुणगुणत रहावी.
कवितांचे छंद, चालीचं सौंदर्य आठवत रहावं.
आठवत आठवत फक्त बसावं.

मनाच्या कोलाहलाला प्रतिसाद देत,
हृदयाच्या स्पंदनांना आश्वासनं देत,
भावनांच्या आवेगाला विश्राम देत, फक्त बसावं.

निवांत. पोकळ. रितं. शून्य.

Image source - TinyBuddha

EDIT : हा लेख (कविता वगैरे म्हणावं कि नाही अशा संभ्रमात आहे मी अजून!) वाचून झाल्यावर माझ्या 'कपिल जगताप' नावाच्या मित्राने त्याने काढलेला एक उत्कृष्ट फोटो मला पाठवला. विषयाला अगदी अनुरूप फोटो सापडल्याने लागलीच हा फोटोसुद्धा upload करावा असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तो केलासुद्धा!
Contact Form

Name

Email *

Message *