Sunday, January 28, 2018

Untitled Post - 3


आज सकाळी अभ्यासासाठी लवकर उठलो होतो. ५ वाजता! थोड्यावेळाने कंटाळा आला म्हणून एक ब्लॉग वाचायला घेतला. हा ब्लॉग मला फार आवडतो. ह्यावरचे जवळपास सगळेच लेख मी कित्येकदा वाचलेले आहेत पण तरी ते प्रत्येकवेळी नवीन आणि तितकेच थ्रिलिंग वाटतात. आता थ्रिलिंग ह्या शब्दाचा अर्थ साहसाशी जोडला जाऊ शकतो ह्याची कल्पना आहे मला, पण एखादी भारी गोष्ट वाचण्यातही एक प्रकारचं थ्रिल असतं.

पहाटेची वेळ होती. माझे नेहमीचे आवडते लेख होते आणि बाहेर सूर्य उगवायचा होता. डिसेंबर महिना चालू असूनही थोडाफार पाऊस होता आणि वातावरणात एकप्रकारची मंद शांतता होती. शेजारच्या घड्याळाच्या टिकटिकीने एक अनाहूत ठेका धरला होता आणि माझं मनही त्या ठेक्यावर धावत होतं. कधीकधी असं होतं ना, कि सगळं जगच इन-सिंक असतं, तसं काहीसं झालं होतं.

थोडावेळ वाचून झाल्यावर लक्षात आलं कि आपली परीक्षा चालू आहे, आणि आपल्याला आता अभ्यासाची गरज आहे. एव्हाना सूर्योदय होऊन गेला होता. पावसाचा जोरही वाढला होता. मला अचानक अभ्यास करण्याची तीव्र इच्छा झाली. मला युज्वली अभ्यास करायला फार वेळ लागतो. ह्याचा अर्थ मी स्लो लर्नर आहे असं नाही, पण त्याची २ कारणं माझ्या लक्षात आली आहेत. एकतर माझं बऱ्याचदा लक्ष नसतं, आणि दुसरं म्हणजे जेंव्हा ते असतं, मी कुठल्याही गोष्टीचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करतो. ह्याचमुळे बऱ्याचदा माझा परीक्षेच्या वेळी अर्धासुद्धा सिलॅबस पूर्ण होत नाही आणि कमी मार्क पडतात.

हे मी काय लिहितोय?? मला डायरी वगैरे लिहायची नव्हती. एकतर मी रोज डायरी लिहीत नाही, आज एकदम कशाला लिहू? आणि दुसरं म्हणजे आत्ताशी सकाळ आहे. सकाळी कुणी कधी डायरी लिहितं का? पण मी माझ्या प्रत्येक कृतीचं कारण का देतोय? आणि कुणाला? हि सवय मला इंजिनीरिंगमुळे लागलीये. फक्त कारण देण्याची नव्हे, कुठलीही गोष्ट अनलाईझ करण्याची. आणि ही असली अनालिसीस असल्या लेखात आली कि ती वाचणाऱ्याला फार बोर होतात ह्याची जाणीव मला हल्लीच झालीये.

बरं बास.

Tuesday, December 19, 2017

HBD ब्लॉगोबा


गेले सलग ६ दिवस ब्लॉगवर पोस्ट टाकत होतो, आणि आजचा हा सातवा दिवस! इतक्या कन्सिस्टन्सीने ब्लॉग लिहीन असं जन्मात कधी वाटलं नव्हतं. (याआधीच्या असंख्य विशेषणांनी भरलेल्या ५ पोस्ट्सपेक्षा हे लिहिताना नक्कीच मोकळं मोकळं वाटतंय...) असो!

आज माझ्या ब्लॉगला २ वर्षं पूर्ण झाली. म्हणजे या ब्लॉगवरची पहिली पोस्ट मी १९ डिसेंबर २०१५ ला टाकली होती, तिला २ वर्षं झाली. २ वर्षांत एकूण २२ पोस्ट मी लिहिल्या. (ही २३वी!) ब्लॉग लिहायला सुरु करण्यापूर्वी इतपत जमेलसं खरंच वाटलं नव्हतं. जमलं तर जमलं, नाही तर नाही... अशा अटीट्युडने ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण एक गोष्ट नक्की ठरवली होती, ती म्हणजे एखादा लेख मनापासून आवडला तरच ब्लॉगवर टाकायचा. थोडंफार जमलेलं काहीतरी, किंवा बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही असल्या कारणांनी कधीच दर्जाहीन गोष्टी पोस्ट करायच्या नाहीत. लोकांना आवडो न आवडो, पोस्ट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे.

२ वर्षात ब्लॉगला साधारण ८२०० पेक्षा जास्त व्हूज मिळाले. त्यापैकी साधारण ६००० पेक्षा जास्त हे भारतातून आणि ९०० पेक्षा जास्त हे अमेरिकेतून मिळालेले आहेत. मला नकाशावर बोटही दाखवता येणार नाही अशा अनेक देशांमधल्या अनेक वाचकांनी हा ब्लॉग वाचला. अनेकदा अनोळखी लोकांच्या कमेंट्स किंवा इमेल आले. एखादवेळेस एखाद्याला एखादा ब्लॉग खूपच भावला तर त्याचं भरभरून कौतुक असेल, किंवा एखादा दुसरा ब्लॉग वाचण्यासाठी सुचवणं असेल... असा प्रतिसाद नेहमीच भारी वाटायचा. त्यात कौतुक झाले यापेक्षा, कुणीतरी निदान वाचतंय तरी असा 'हुश्श!' भाव अधिक असायचा.

मी ब्लॉग लिहायला सुरु केलं तेंव्हा मराठी ब्लॉग्सच्या डिरेक्टरीज असायच्या. त्यावर एकदा रजिस्टर केलं कि नवीन ब्लॉग टाकल्यावर तिकडे दिसायचा. मग तिकडे येणाऱ्या लोकांना टायटल बरं वाटलं तर ते आपला ब्लॉग वाचणार. मी जिथे रजिस्टर केलं ती ब्लॉग डिरेक्टरी आता बहुदा बंद पडलीये आणि बाकी डिरेक्टर्यांना मला रजिस्टर करून घेण्याची इच्छा दिसत नाहीए. त्यामुळे आता जे काही व्ह्यूज येतात ते मीच गावभर केलेल्या जाहिरातीमुळे.

अनेकांना माझा ब्लॉग आवडतो. अनेक जण वाट बघतात. भेटल्यावर आवर्जून आठवण काढतात. लिहायला प्रोत्साहित करतात. असं कुणाकडून काही ऐकलं कि बरं वाटतं. अनेकांना ब्लॉग आवडतही नाही. अशा लोकांचाही मला उपयोग होतो. त्यातले काही लोक खरंच चांगल्या सुधारणा सुचवतात. मी त्यांचा विचार करतो, त्या पटल्या तर अमलात आणतो. याचा मला माझा ब्लॉग सुधारण्यास फायदा होतो. पण काही लोक काही कारण नसताना (किंवा आवडला असूनही तसं म्हणायची लाज वाटत असल्याने, किंवा पचत नसल्याने) ब्लॉगला नावं ठेवतात. यावरून मला मी करतो ती गोष्ट नक्की कुणासाठी आहे हे जास्तीत जास्त क्लिअर होत जातं. चालायचंच!

२ वर्षं म्हणजे काही फार मोठा टप्पा नाही याची मला जाणीव आहे. पण आपण केलेल्या गोष्टींकडे मागे वळून बघायला कुठे काय ठराविक कालावधी असतो? तुमच्यासारख्या माझ्या लाडक्या वाचकांमुळेच मी इतकं लिहू शकलो. यापुढेही मला मोटिवेट करत रहा, चुकांची जाणीव करून देत राहा, सुधारणा सुचवत राहा, आवडलं तर तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचवत जा. एवढं पुरेसं आहे मला. (आणि हो! अनेकांनी अनेकदा विचारलेला प्रश्न- मला ब्लॉगचे पैसे किती मिळतात? उत्तर आहे, शून्य! मराठी ब्लॉगवर जाहिराती वगैरे देत नसतं कुणी. भविष्यात मिळायला लागले तर नक्की सांगेन. (किंवा तुम्हाला माहित असेल कसे मिळवायचे तरी सांगा!))

खाली काही स्क्रीनशॉट लावले आहेत. जाता जाता वाचून जा!अजून होते थोडे... पण हरवले!

Monday, December 18, 2017

सवाई २०१७ । दिवस पाचसकाळी ११:४५ला सुरु होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ पासून येऊन थांबलेले रसिक, रमणबागेच्या बाहेरच्या रस्त्यावर किलोमीटरभर लांब रांग, सुरक्षाव्यवस्थेसाठी नेहमीपेक्षा दुप्पट तयारी, आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरचं पार्किंग फुल्ल आणि मंडपाच्या आत जाण्यासाठी रसिकांची उडालेली झुंबड!!


हे आहे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचं वर्णन. स्वर्गीय सूर अनुभवण्याची शेवटची संधी, रविवार आणि मोठ्या मोठ्या प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण असा तिहेरी योग असताना अलोट गर्दी होणं साहजिकच होतं. अशा गर्दीतून वाट काढत सर्व रसिकांनी आपापल्या आवडीच्या जागा पटकावल्या आणि पहिल्या गायकाची म्हणजेच महेश काळेची आतुरतेने वाट पाहू लागले.

महेश काळे येताच त्याचं अगदी जल्लोषात स्वागत झालं. त्याची लोकप्रियता पाहता ते अगदी अपेक्षित असंच होतं. "माझ्या वयापेक्षाही जास्त काळ संगीत ऐकणारे श्रोते इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत." असे सवाईच्या श्रोत्यांबद्दल गौरवोद्गार काढून त्याने गायनास सुरुवात केली. आजच्या सादरीकरणासाठी त्याने राग शुद्ध सारंगची निवड केली होती. सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात त्याने आपल्या ढंगदार गायनाने वातावरणाचा ताबा घेतला. त्याचे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांना उद्देशून त्याने रचलेल्या बंदिशींचे त्याने सादरीकरण केले. बुवांना उद्देशून त्यात 'श्यामरंग' असा असा शब्द वापरला होता. आपल्या सादरीकरणात त्याने वैविध्यपूर्ण गायकीचे प्रदर्शन घडवले. राग सादर करून झाल्यावर रसिकाग्रहास्तव त्याला वेळ वाढवून देण्यात आली. वाढीव वेळात त्याने अवघे गर्जे पंढरपूर हा अभंग व कट्यार काळजात घुसली चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे गीत 'अरुणी किरणी' गाऊन पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकून घेतली.

महेशला तबल्यावर निखिल फाटक, पखवाजला प्रसाद जोशी, व्हायोलिनवर जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, हार्मोनियमवर राजीव तांबे, तंबोऱ्याला प्रह्लाद जाधव व पूजा कुलकर्णी यांची तर टाळाला अर्थातच माउली टाकळकर यांची साथ लाभली.

Image may contain: 3 people, people smiling
महेश काळे -  'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

महेश काळे याच्या अंगावर शहारे आणणाऱ्या सादरीकरणानंतर स्वरमंचावर पद्मा शंकर यांचे आगमन झाले. कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिन सादर केलेल्या पद्मा यांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मृदंगम आणि तबल्याच्या साथीने त्यांनी राग हंसध्वनी रंगवला. साथीदारांना पुरेपूर वाव देत केलेले सादरीकरण हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. कर्नाटकी संगीताच्या वेगळेपणाचा त्यांच्या सादरीकरणात पुरेपूर प्रत्यय आला. हंसध्वनीनंतर त्यांनी संत त्यागराजा यांनी एक रचना वाजवली. पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन म्हणून त्यांनी 'माझे माहेर पंढरी' हा अभंग देखील सादर केला. यानंतर रसिकांनी वन्स मोअर दिल्याकारणाने त्यांनी भीमसेनजींचाच 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा अभंग व्हायोलिनवर सादर करून मंचाचा निरोप घेतला.

पुढील सादरीकरण सुधाकर चव्हाण यांच्या गायनाचे होते. त्यांना तबल्यावर नंदकिशोर ढोरे, हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, पखवाजवर गंभीरमहाराज आणि टाळला सर्वेश बादरयाणी यांची साथ लाभली. रागसादरीकरणांनंतर त्यांनी 'ज्ञानियांचा राजा' हा अभंग गाऊन दाखवला. यावेळी जणू त्यांच्या दमदार आवाजाला भक्तीरसातील गोडव्याचं कोंदण लाभल्याचा भास झाला.

त्यापुढील सत्रात राजन कुलकर्णी व त्यांचे पुत्र सारंग कुलकर्णी यांनी सरोदवादन केले. या सादरीकरणासाठी त्यांनी राग वाचस्पतीची निवड केली. तबल्यावर निशिकांत बडोदेकर तर पखवाजवर ओंकार दळवी यांनी त्यांना साथ-संगत केली. रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

पुढील सादरीकरण हे रसिकांना आस लागून राहिलेल्या आनंद भाटे यांचं होतं. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या भाटे यांनी राग यमन कल्याण गात मैफलीस सुरुवात केली. अत्यंत सुमधुर अशा आवाजात उत्तरोत्तर रंगत गेलेलं सादरीकरण हा दिवसाचा परमोच्च बिंदू होता. शेवटी 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हा कन्नड अभंग सादर करून भाटे यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. सकाळी व्हायोलिनवर ऐकलेलं गीत संध्याकाळी साक्षात आनंदगंधर्वांच्या तोंडून ऐकणं हि रसिकांसाठी सुखाची पर्वणी होती. भाटे यांना तबल्यावर भरत कामत तर हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांची साथ लाभली. तंबोरा सांभाळायला विनय चितराव व मुकुंद बादरायणी सज्ज होते. अभंगाच्या वेळी टाळाची साथ करायला माउली टाकळकर यांनी हजेरी लावली. माउलींचा उत्साह बघून आनंदगंधर्वांच्या तोंडून हे ९१ वर्षाचे नसून १९ वर्षांचेच आहेत असे उद्गार निघाले!

भाटेंच्या दैवी सादरीकरणाला वन्स मोअर देण्याचा रसिकोत्साह पाहून श्रीनिवास जोशी यांनी 'आनंद आपलाच आहे, परत कधीतरी नक्की गाईल' असं सांगत, वेळ पाळली नाही तर आम्हाला बुजुर्गांचे फटके खावे लागतात या सत्याची जाणीव करून दिली.

Image may contain: 3 people, people on stage
आनंद भाटे - 'सवाई'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून

पुढच्या सत्रात उस्ताद शुजात खां यांनी सतारवादन केले. दोन तबलजी घेऊन वादन करण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला. राग झिंझोटीचे बहारदार सादरीकरण हा रसिकाकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शेवटी सतारवादनासोबतच गात गात त्यांनी एक गझल सादर केली. त्यांच्या लौकिकास साजेसे असेच त्यांचे सादरीकरण ठरले.

ठेवा!

शेवटचे सादरीकरण किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाचे होते. मी त्या सादरीकरणासाठी थांबू शकलो नसल्याने त्याविषयी लिहू शकत नाही. परंतु प्रभाताईंनी राग जोगकंसची मांडणी केली असे कळते.

रसिकांना श्रवणसुखाचा परमोच्च आनंद देऊन ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. देशोदेशीच्या शास्त्रीय संगीताच्या उपासकांसाठी शिरस्थ असलेल्या या संगीतसोहळ्याचा आज समारोप झाला. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं किती महत्व असू शकतं याची जाणीव करून देणाऱ्या या पाच दिवसांची आज सांगता झाली. अनेक संगीतोपासकांना, अभ्यासकांना, रसिकांना आणि अभिजात शास्त्रीय संगीताच्या दैदिप्यमान परंपरेला या महोत्सवाने काय आणि किती दिलं आहे हे शब्दांत मांडता येत नाही.

काही गोष्टींसमोर नतमस्तक व्हायचं असतं, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या याबद्दल देवाचे शतशः आभार मानत. सवाईविषयी याहून वेगळी कुठलीच भावना नाही!

रजत जोशी

Contact Form

Name

Email *

Message *